in

राज्यातील कोरोना स्थितीवरून अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या ६ महत्त्वाच्या सूचना

राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप दूर झालेलं नसतानाच म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्णही वाढू लागले आहेत. या दोन्ही आजारांमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

महत्त्वपूर्ण बैठकीत अजित पवारांनी नेमक्या कोणत्या सूचना दिल्या?

१. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. आशा वर्कर्सना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत कोरोना चाचण्या कराव्यात. ग्रामदक्षता समित्यांना अधिक क्षमतेनं कार्यान्वित करावं.

२. कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकानं शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे.

३. म्युकर मायकोसिसच्या आजाराचं पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीनं औषधोपचार सुरु केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरु करण्यात यावेत; जेणेकरून या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. म्युकर मायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्यानं प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकर मायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होईल.

४. हाफकीन इन्स्टिट्यूटमार्फत काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र रेमडेसिवीरप्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

५. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्यात यावेत.

६. लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी. प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचं योग्य नियोजन करण्यात यावं. खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करावी; त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यात यावी.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पदोन्नती आरक्षण | “जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा”

तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे निधन