in

बारामतीत ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीवर गुन्हा… सत्य समोर आल्यानंतर राष्ट्रवादीची आगपाखड

बारामतीतील सिल्वर ज्युब्ली रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर खुर्चीत उपचार सुरू असल्याची बातमी लोकशाही न्यूजने दिली होती. यासंदर्भात ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीत बेड्स योग्य वेळी उपलब्ध झाले असते, रुग्णावर अशी वेळ ओढावली नसती. मात्र, यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादीत चहापेक्षा किटली गरम असल्याचं चित्र आहे. या प्रकरणावर अद्याप राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बदनामीकारक आणि खोटी बातमी प्रसारित केल्याचा ठपका लोकशाहीच्या पत्रकारावर ठेवण्यात आला आहे. बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी पुढाकार घेत गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण…

९ एप्रिल २०२१ रोजी एक ७५ वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी बारामतीच्या सिल्वर ज्युब्ली रुग्णालयात दाखल झाला. यानंतर संबंधित रुग्णाला अहिल्यादेवी होळकर वसतीगृह या ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगिकरणासाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १० एप्रिल २०२१ रोजी या रुग्णाला जास्त त्रास होऊ लागल्याने तात्काळ सिल्वर ज्युबली हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा हलविण्यात आले. या रुग्णासाठी बेडची उपलब्धता होईपर्यंत तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता होती. यासाठी सिल्वर ज्युब्ली हॉस्पिटलचे डॉ. सदानंद काळे यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णावर तत्काळ उपचार करण्यास सुरुवात केली, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली आहे.

लोकशाहीची बातमी

या प्रकरणाचा व्हिडीओ लोकशाही न्यूजवर प्रसारित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात रुग्णांची होणारी हेळसांड आणि वेळीच बेड्सची उपलब्धता नसल्याने रुग्णांवर अशी वेळ ओढावल्याची बातमी लोकशाही न्यूजने दाखवली. वेळीच बेड उपलब्ध झाला असता, तर या रुग्णावर ही वेळ ओढावली नसती. डॉक्टरांनाही रुग्णाला खुर्चीत बसवून त्याच्यावर उपचार करण्याची परिस्थिती ओढावली नसती. मात्र, यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असून लोकशाहीच्या प्रतिनिधीवर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पावसाची शक्यता

CM Uddhav Thackeray : हीच ती वेळ … मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी साधणार संवाद