राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण मुख्यमंत्र्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे दिले होते मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केलेली नाही असं फडवीस यांनी म्हटलं आहे. तसेच या फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय गृह सचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी आज दिल्लीला जात असून केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देणार असून सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, असं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे.
फडणवीस यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर पोलीस दलातील अनागोंदीवरुन जोरदार आरोप केले. “पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अनेक सबळ पुरावे गोळा केले होते आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. पण त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना, माझ्या माहितीनुसार त्याच्यानंतर संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात चिंताही व्यक्त केली होती. मात्र पुढे काही झालं नाही असं फडणवीस म्हणाले. “६.३ जीबीचा डेटा माझ्याकडे आहे. ज्याच्यामध्ये इंटरसेप्ट केलेले सगळे कॉल्स आहेत. लेटर व कॉल्सचे ट्रान्स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे,” असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Comments
Loading…