गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने देखील ही दुसरी लाट असल्याचे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन पुन्हा होते का, याची चर्चा सुरू आहे. नंदुरबारच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसा पर्याय समोर असल्याचे सांगितले.
गेले दोन दिवस नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढेच आहे. काल तर हा आकडा 25 हजार 833वर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा पर्याय समोर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण त्याचबरोबर मला लोकांकडून अजूनही सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरत आहेत, असे ते म्हणाले.
आपल्याकडे आलेल्या कोरोना विषाणूच्या नवा स्ट्रेनची रुग्णसंख्याही नियंत्रणात आली आहे. मात्र ज्याप्रकारे या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे, तो पाहता हा नवा स्ट्रेन आहे का, हे अद्याप हे स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
134 खासगी रुग्णालयात लसीकरण
राज्यात 134 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून 3 ते 4 महिन्यांत प्राधान्य गटाला दोन डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. उन्हाळ्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत दिले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांशी संवाद साधत लसीकरणाचा आढावा घेतला.
Comments
Loading…