गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर याचं आज निधन झाले असून ते ७२ वर्षांचे होते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ते दुर्धर आजारानं त्रस्त होते. आज मेंदूतील रक्तस्त्राव गोठल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, ४ मुले, नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दत्ता इस्वलकर मॉर्डन मिलमध्ये कारकून पदावर नोकरीला होते. ते राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्थांशी संबंधित होते. त्यांनी कामगार नेते दत्ता सामंत यांच्या नंतर गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी संघर्ष सुरु केला. ते गिरणी कामगारांचे नेते होते. त्यांनी २ ऑक्टोबर १९८९ ला गिरणी कामगारांच्या संघर्षाला सुरुवात करून सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर हे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात १९८८-८९ ला बंद पडलेल्या गिरण्या सुरु झाल्या. बंद गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी संघर्ष केला. त्यांच्या निधनानं गिरणगावात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Loading…