अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वयंपाक्याच्या थेट कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला होता. धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता तफावत जाणवल्यावर त्यांनी थेट कानशिलात लगावली. या प्रकरणावर भाजप आक्रमक झाली असून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर या प्रकरणावरून आक्रमक झाले असून राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय ? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो? असा सवाल उपस्थित केला. तसेच सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भातखळकर यांनी केली.
प्रकरण काय ?
पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, येथील स्वयंपाक्याचे खोटे उघडे पडल्यानंतर त्यांनी स्वयंपाक्याच्या थेट कानशिलात लगावली. या प्रकारानंतर संबंधित पुरवठादारावरही चौकशी बसविण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
Comments
Loading…