in ,

‘किती जाड झालीये’ जेव्हा बॉडी शेमींगचा सामना करावा लागला स्पृहा जोशीला

उत्तम अभिनेत्री, संवेदनशील कवयित्री, निवेदिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्पृहा जोशीला कलाविश्वात बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. याबद्दल खुद्द स्पृहानेच फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. स्पृहाची ही पोस्ट अनेक आठवणींनी भरलेली असून प्रत्येक चाहत्याला विचार करायला भाग पाडणारी आहे.

स्पृहाची पोस्ट,

‘२०१८.. वेगवेगळ्या पातळयांवर स्वतःशी स्ट्रगल करत या वर्षाची मी सुरुवात केली होती. पर्सनल, प्रोफेशनल सगळ्या पातळ्यांवर अनेक चॅलेंजेस समोर होती. मनासारखं काम मिळत नव्हतं, तब्येतीकडे दुर्लक्ष होत होतं. अनेक माणसांची वेगळीच रूपं सामोरी आली होती. या सगळ्यात प्रसिद्धी माध्यमांमध्ये हसरा चेहरा ठेऊन वावरण्याची कसरत करता करता दमून जायला झालं होतं. पण हळूहळू ‘वन डे एट अ टाईम ‘असं म्हणत, स्वतःच स्वतःला बुस्ट करत गाडं रुळावर यायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक नवा छंद जोपासायला लागले. डुडल्स करण्याचा.. चित्रकलेच्या वहीत एकही उभी आडवी रेष ना मारणारी मी मुलगी, हा छंद सापडला तशी स्वतःवरच खुश होत गेले. मी काही नव्या कविता लिहिल्या. तिसऱ्या कवितासंग्रहाचं काम वेग घ्यायला लागलं..
या वर्षात प्रोफेशनली म्हणावं तसं यश मिळालं नाही. ‘देवा’ आणि ‘होम स्वीट होम’मधल्या भूमिकांचं कौतुक झालं. पण नवीन चित्रपटांसाठी आपला विचारच केला जात नाहीये हे लक्षात आलं आणि आधी राग आणि नंतर रिअॅलिटी चेक करायला मला या गोष्टीने भाग पाडलं. पण ऑक्टोबरनंतर मात्र मरगळ आलेल्या मला ‘सूर नवा ध्यास नवा’ ने जवळपास ‘श्वास नवा’ दिला. फारच गोड अनुभवांची शिदोरी या कार्यक्रमाने दिली आणि त्याच बरोबर ढळढळीतपणे बॉडी शेमिंगचाही अनुभव घेतला. ‘किती जाड झालीये,’ ‘ही कसली हिरोईन’, ‘किती बेढब शरीर’, ‘मराठीत काही अवेअरनेसच नाही’, इथपासून ते एका दिग्दर्शकाने तर कर्णोपकर्णी मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी मला चित्रपटात काम द्यायचं नाही असं ठरवल्याची फारच प्रोत्साहनपर बातमी माझ्या कानावर घातली. आधी राग आला. मग वाईट वाटलं. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचं खूप दुःख झालं. पण मग एका पॉईंटला डोळे खडखडून उघडले. झोपेतून कोणीतरी हलवून हलवून जागं केल्यासारखं झालं आणि मग अचानक सगळा कडवटपणा निघूनच गेला. हे २०१८ ने मला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट!

आत्ता या घडीला मी माझं सगळ्यात चांगलं आयुष्य जगायचा प्रयत्न करतेय. स्वतःवर पूर्ण लक्ष केंद्रित करतेय. मी जशी आहे तशी आवडून घ्यायचा प्रयत्न करतेय. समोरची वाट अनोळखी आहे. पडाव अजूनही दिसत नाहीयेत, पण त्या वाटेवरून जायची प्रचंड उत्सुकता आहे. ‘आता पुढे काय?’ची एक्साइटमेंट आहे. स्वतःलाच घालून दिलेली नवीन नवीन आव्हानं आहेत. नवी स्वप्नं, नव्या पॅशन्स, नवी गोल्स आहेत. मी आणखी आत्ता मध्ये, त्या क्षणात जगण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचा प्रयत्न करतेय.

अशा गोष्टी शोधतेय ज्या केल्या की मला बरं वाटतं. खुश वाटतं. माझा पुढचा दिवस चेहऱ्यावर हसू ठेवून जातो. खरं सांगायचं तर लोक काय म्हणतात, पासून सुरु झालेला अट्टाहास मला कसं वाटतंय पर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे माझ्या आसपास बाकी मंडळी काय स्पर्धेत आहेत, याचा आता मला फारसा फरकच पडत नाहीये. मी माझी माझी मजेत आहे. माझी ग्रोथ मला समोर दिसतेय. आणि मी आणखी चांगली माणूस बनतेय. छान होपफुल वाटतंय. या प्रवासात कुठलीही दुसरी व्यक्ती माझ्यासाठी अडथळा बनू शकणार नाही इतका हा प्रवास आनंदाचा झालाय. मला खूप हलकं हलकं वाटतंय..

– स्पृहा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price Today | काय आहेत आजचे इंधनांचे दर?

लखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; राष्ट्रपतींना भेटून केली ‘ही’ मागणी!