in

‘चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं’

‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच करायचा आहे’, असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडूनही सातत्याने स्वबळाचा नारा दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वतंत्र निवडणुका लढवण्याचे संकेत दिले जात असून, शिवसेनेनं यावर भाष्य करत समाचार घेतला आहे. “एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे,” असा सल्लाही शिवसेनेनं काँग्रेसला दिला आहे.

काँग्रेसकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा केली जात असून, शिवसेनेनं सामना अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे. “करोनाचे संकट पाहता बेभान गर्दी आवरा, असे आदेश केंद्र सरकारने दिले त्याच धर्तीवर या संकटकाळात सुरू असलेले बेभान राजकारणही आवरा, नाही तर लोक जोड्याने हाणतील, असा कडक सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावला. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख काय बोलणार, काय सांगणार, काय गरजणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. पण शनिवारी संध्याकाळी गडगडाट होऊन विजा चमकाव्यात असे चमकदार भाषण करून उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील मार्गाची दिशा दाखवली. शनिवारी राहुल गांधी यांचाही वाढदिवस होता. यानिमित्ताने काही कार्यक्रम, पक्षप्रवेश असे काँग्रेसी सोहोळे पार पडले. त्यातील एका सोहोळ्यात प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तर त्याही पुढे जाऊन म्हणाले, ‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच करायचा आहे.’ चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसविले होते व फडणवीसांचे राज्य आले होते. त्यामुळे चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची बांधणी नव्या जोमाने करावीच लागेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करीतच असतात. त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाली. या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्यांचीच नियत ढळली – स्वामी दिलीप दास

समाजसेवक म्हणून घेणाऱ्याच्या घरातच हातभट्टीचा अड्डा