राज्यात कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने शनिवार-रविवार लॉकडाऊन आणि आठवड्याच्या इतर दिवशी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सर्व सेवांप्रमाणेच खाद्यसेवा देणाऱ्या Swiggy आणि Zomato यांनी देखील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ८ नंतर झोमॅटो किंवा स्विगीवरून आता अन्नपदार्थ मागवता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही अॅपवरून ग्राहकांना त्यासंदर्भात माहिती दिली जात असून संध्याकाळी ८ च्या आतच ऑर्डर देण्यासंदर्भात सूचना केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने शनिवार-रविवार हे वीकएंडचे दिवस वगळता आठवड्याच्या इतर दिवशी संध्याकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबतच, दिवसाच्या इतर वेळी जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या काळामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर स्विगीने नियमांचं काटेकोर पालन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘करोनाशी लढा देण्यामध्ये राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना साथ देणं आम्ही सुरूच ठेवणार आहोत. गेल्या महिन्यातच आम्ही घोषणा केली होती की आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये करोनासंदर्भात आणि नियमांसंदर्भात काळजी घेण्यासाठी जनजागृती करत आहोत.’ असं स्विगीकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Loading…