राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणाचे वारे वाहू लागले असतानाचं आता ऑपरेशन लोटसचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे खरच आता राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवतेय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे अनेक कारनामे बाहेर येत असताना भाजप मात्र गल्लीसह दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन लोटस राबवताना दिसत असल्याचे विधान माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. या ऑपरेशन लोटसची सुरुवात म्हणून सातारा जिल्ह्यात अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही निंबाळकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता ऑपरेशन लोटसची चर्चा रंगलीय.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेत असल्याने शिवसेनेच्या पोटात दुखू लागले असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच शिवसेनेला जनतेने डावलले असताना देखील इतर पक्षाच्या सहाय्याने शिवसेना आयत्या बिळात नागोबा सारखी सत्तेत बसली असल्याचाही चिमटा त्यांनी यावेळी काढला. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजप पाडत नसून ते त्यांच्या कर्तृत्वानेच पायउतार होणार असल्याचीही टीकाही केली.
Comments
Loading…