मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतचं चालली आहे. आजच्या नवीन रुग्णसंख्येने 10 हजाराचा पल्ला ओलांडला. विशेष म्हणजे मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे निर्बंध लावून सुद्धा रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे.
मुंबईकरांसाठी असलेल्या नवी नियमावलीनुसार चौपाट्या आणि समुद्रकिनारे 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये येणा-या लक्षणे नसणा-या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करता येणार नाही. लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करुन त्याचा रिपोर्ट आयसीएमआर गाईडलाईनप्रमाणे प्रशासनास कळवावा लागेल.
इमारती होणार मायक्रो कंटेंटमेंट झोन
5 किंवा 5 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मुंबईतील इमारती आता मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून ओळखल्या जातील. अशा इमारतीबाहेर मायक्रो कंटेंटमेंट झोनचा बोर्ड लावाला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनमधील सर्व निर्बंध आणि नियम पाळले जाण्याची जबाबदारी सोसायटीवर राहील. नियम मोडल्यास 10 हजार आणि पुन्हा नियम मोडले जातील तेव्हा 20 हजार दंड आकारला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनच्या इमारतीसमोर एक पोलीस कर्मचारी नेमला जाईल.
Comments
Loading…