मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यानंतर लोकसभेतही याचे पडसाद उमटले. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना सावंत यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर त्यांचा राग असण्याच्या कारणांचाही त्यांनी उलगडा केला.
खासदार अरविंद सावंत म्हणाले,”हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर बघितलं, तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?,” असं सावंत म्हणाले.
“आज सभागृहात झाल्याचं त्यांचं काही म्हणणं आहे. तर आज महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपाचे खासदार बोलत होते. त्यामुळ आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या समोरील हौद्यात (वेल) गेलो होतो. घोषणा देत होतो. जाताना मी जर त्यांना असं बोललो, तर मी तिथं थांबायलाही हवं होतं ना. त्यांच्या आजूबाजूला लोकं बसलेली असतात. त्यांना विचारावं. अशी भाषा मी वापरेल का? माझ्याकडून असं आयुष्यात होणार नाही. त्या एक महिला आहेत. अशी कामं आम्ही करत नाही,” असं सावंत म्हणाले.
आजही बघा. सभागृहात कुणाचंही नाव घ्यायचं नाही म्हणून सभागृहात टोकलं जातं. कारण ते नोंदलं जातं. हे सगळं बघितलं की वाईट वाटतं. मी कधीही महिलांना धमकावलं नाही. लोक सरळ सरळ खोटं बोलू शकतात, याचंही मला आश्चर्य वाटतंय. काही लोकांकडे कौशल्य असतं की, एखाद्या गोष्टीवरून प्रसिद्ध मिळवणं. त्यांचा मागील एक दीड वर्षांचा काळ बघा. अॅसिड फेकण्याचं कृत्य कधीच करणार नाही, पण जर कुणी करत असेल, तर मी नवनीत राणांच्या बाजूने उभा राहिलं,” असं म्हणत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळून लावला आहे.
Comments
Loading…