मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आता मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणारी आणि सिंग यांच्या बदली निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे.
परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच याचिकेमध्ये अनिल देशमुखांची सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते.
तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेची या प्रकरणामध्ये एन्ट्री झाली. तपास अधिकारी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचा आरोप झाला. सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले तर, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती.
Comments
Loading…