in

मृतदेहाचा तब्बल 6 किमी प्रवास, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

अनिल ठाकरे,चंद्रपूर | पोलीस म्हटलं की सर्वांच्या भुवया उंचावतात. पोलिसांमध्ये माणुसकी नसते, ते कठोर असतात, अशी सर्वसामान्यांची समजूत आहे. त्यामुळे लोक खाकी वर्दीपासून दूर राहणे पसेत करतात. पण मुळात या समजुतीत तथ्य नाही. पोलिसांनाही मन असते, त्यांच्यातही आपुलकी, माणुसकी या संवेदना असतात. असाच काहीसा अनुभव चंद्रपूर येथे घडलेल्या एका दुःखद घटनेवरून आला आहे. पोलिसांनी तब्बल 6 किमी पायपीट करून एक मृतदेह ताब्यात घेतला.

चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर महाल्ले, पोलीस शिपाई रामदास चिटले, निलेश जीवतोडे, दिपक गुरुनुले यांची एक टीम लगेच घटनास्थळी पाठवली. चंद्रपूर शहराजवळील नांदगाव पोडे परिसरात रेल्वे रुळावर हा मृतदेह पडला होता. पण इथपर्यंत जायचे कसे? हा प्रश्न होता. शेवटी पोलिसांनी आपले वाहन एका ठिकाणी उभे करून चिखल-काट्यागोट्याची वाट धरली.

तब्बल तीन किलोमीटरचा रस्ता तुडवत पोलीस त्या मृतदेहाजवळ पोचले. रेल्वेखाली आल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. दुर्गंधी सुटली होती. पण कर्तव्य महत्त्वाचे मानून पोलिसांनी हा मृतदेह उचलला. आणि पुन्हा तीन किलोमीटरचा खडतर मार्ग पार करीत मृतदेह वाहनात ठेवला. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. शवविच्छेदन करून तो कुणाकडे द्यावा, हा प्रश्नच होता त्यामुळं नातेवाईकांची पोलिसांनी दोन दिवस वाट बघण्याच ठरवलं आहे. शेवटी तो सडत ठेवण्यापेक्षा त्याला अग्नी देणे केव्हाही उचित मानून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एका बेवारस मृतदेहाला शोधून, प्रसंगी हाल सहन करून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली. पोलिसांची काळी बाजू नेहमीच चर्चेत असते. किंबहुना त्याचाच अधिक बाऊ केला जातो. मात्र त्यांच्याकडून होणाऱ्या चांगल्या कामांची कधीच वाहवा होत नाही. सदैव टीका सहन करणारी खाकी बऱ्याचदा कौतुकास्पद कामगिरी करते. मात्र त्याचे ना कौतुक होत, ना कुठे प्रसिद्धी मिळत. तशी कौतुक आणि प्रसिद्धीची अपेक्षाही पोलिसांना नाही. कर्तव्य बजावणे, एवढेच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे. पण हे कर्तव्य बजावताना त्यांच्या हातून असे नकळत महत्कार्य घडून जाते, ज्याचे कौतुक समाजाने करायला हवे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवरात्रीचे औचित्य साधत 12 महिलांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान

“आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ शिवसेना;”महागाईवरुन शिवसेनेचा टोला