राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाउन करण्याच्या हालचालीसुद्धा वाढल्या आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला होता. महिंद्रा यांच्या भूमिकेवर राऊत यांनी टीका केली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाउन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
”महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. पश्चिम बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉक डाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही,” असं राऊत म्हणाले.
कोरोना ही अंधश्रद्धा नसून महामारी आहे. पंतप्रधान मोदींनी लॉकडाउन काळात लोकांना थाळ्या आणि टाळ्या पिटायला लावल्या. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा जातीधर्माशी संबंध नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीनं महाराष्ट्रात लॉकडाउन करण्यास विरोध केला आहे पण पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय लॉकडाउन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता पण पुन्हा लॉकडाउन नको ही त्यांची भावना चुकीची नाही, असंही राऊत म्हणाले.
Comments
Loading…