राज्यातील पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. विशेषत: सचिन वाझे प्रकरणांमुळे मुंबई पोलिसांच्या स्कॉटलँड यार्ड प्रतिमेलाच तडा गेला आहे. अंबानींच्या घरासमोर गाडीत जिलेटीन ठेवण्याच्या प्रकरणापासून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणापर्यंत वाझेंचे नाव खूप बदनाम झाले.
त्यापाठोपाठ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर पुन्हा खळबळ उडाली. त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला. अनिल देशमुख यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा खळबळजनक आऱोप त्यांनी केला. तर, पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पबवर कारवाई केल्याने आयुक्तांनी निलंबन करण्यात आले आणि पुन्हा कामावर घेण्यासाठी परमबीर सिंह यांच्या नावे 2 कोटींची मागणी करण्यात आली. शिवाय, परमबीर सिंह यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला.
वाझेवरील गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप, परमबीर सिंह यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप सुरू असतानाच वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्लाही चर्चेत आल्या आहेत. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर 2019मध्ये सत्तास्थापनेच्या नाट्यावेळी भाजपाच्या विरोधात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट असल्याचा आरोप केला आहे.
कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामांचे खूप कौतुक झाले. स्कॉटलँड पोलिसांशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांची गँगवार आणि एन्काउंटर प्रकरणांनंतर डागाळलेली प्रतिमा बऱ्यापैकी उजळ झाली होती. मात्र, वाझे प्रकरणानंतर सुरू असलेला घटनाक्रम पाहता. खाकी वर्दीवर पुन्हा आरोपांचे शिंतोडे उडले आहेत.
Comments
Loading…