केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रावर केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यावर हलगर्जीपणाच ठपका ठेवणाऱ्या केंद्र सरकारला राज्य सरकारचे उत्तर दिले आहे. त्यासोबतच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
“राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लसी का?” असा सवाल देखील राजेश टोपे यांनी केला आहे.
“आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्ष वर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?”, असा सवाल टोपेंनी केला आहे. “मला कुणावर आरोप करायचे नाहीत. राज्यातले सर्व कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केलीय, दर आठवड्याला ४० लाख लसींची मागणी आमची पुरवावी ही आमची मागणी आहे”, असं ते म्हणाले.
Comments
Loading…