काेराेनाचा पुन्हा वाढणारा संसर्ग आणि शिक्षण मंडळ ऑफलाईन परीक्षांवर ठाम असल्याने दहावी, बारावीचे जवळपास ५२ हजार ५५८ विद्यार्थी यंदा परीक्षा न देण्याचा विचार करीत आहेत. राज्यात युट्युबवरून मोफत शिक्षण देणाऱ्या विविध अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, पालकांनी परीक्षेआधी एक सर्वेक्षण केले असून, त्याला राज्यातून तब्बल १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
तर परीक्षेवर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६९ हजार ७५२ म्हणजे जास्त असली तरी अद्याप परीक्षा द्यायची की नाही, याबाबत तब्बल ३६ हजार २९१ विद्यार्थी संभ्रमात आहेत. राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील पालक व विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे शिक्षक दिनेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.
राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थी सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यातील ७१ टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ७९४ विद्यार्थी बारावीचे, तर ३६ हजार १३४ विद्यार्थी दहावीचे होते. ९ हजार ६७३ विद्यार्थी हे इतर इयत्तांचे होते. ऑनलाईन परीक्षा व्हावी, असे मत नोंदवत असतानाच वर्षभर चाललेल्या ऑनलाईन तासिकांबाबत असमाधानी असल्याचे मत ६९ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
Comments
Loading…