राज्यात पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गोपनीय अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सादर केला. या अहवालानंतर राज्याच्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या अहवालामध्ये महादेव इंगळे नावाच्या एका दलालाचा उल्लेख करण्यात आलाय. या महादेव इंगळेने अनेक पोलीस अधकाऱ्यांच्या बदलीसाठी दलाली केल्याचा आरोप करण्यात आलाय.
नक्की महादेव इंगळे आहे तरी कोण ?
महादेव इंगळे हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या शेळका धानोरा गावचा रहिवासी आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन ओएसडी असलेल्या प्रवीण परदेशींच्या घरी महादेव इंगळे केअरटेकर असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण परदेशीं तत्कालिन मुख्यमंत्र्य़ांचे ओसएडी असल्यानं अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल प्रवीण परदेशी यांच्याकडे येत त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या महादेव इंगळेला कोणत्या अधिकाऱ्याला कुठे बदली हवी याची माहिती मिळायची. त्यातून तो अधिकाऱ्यांना थेट फोन करत असे आपण मंत्रालयात काम करतो आणि अनेक बड्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी थेट संपर्क असल्याचं भासवून महादेव इंगळे अधिकाऱ्यांशी ओळख वाढवत होता. बदलीचं काम करण्यासंदर्भात त्यांच्याकडे पदानुसार 35 ते 40 लाखांची मागणी करत होता. त्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी महादेव इंगळेला पैसैही दिल्याचं समजतंय. अशाप्रकारे महादेव इंगळेनं अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि अनेक जणांच्या बदल्यांची कामं हाती घेतल्याचं रश्मी शुक्ला यांच्या अहवालात म्हटलंय.
विशेष म्हणजे महादेव इंगळे या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहमंत्री आणि दादा यांच्याकडून करून घेत असल्याचं या अहवालात नमूद केलंय. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अहवालातील गृहमंत्री आणि दादा नेमके कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी महादेव इंगळेला कधी शोधून काढलं जाणार, असा सवालही उपस्थित होतोय.
Comments
Loading…