in ,

‘पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार?’

गेल्या काही दिवसांपासून पेगॅससचा मुद्दा देशभरात गाजत आहे. विरोधकांनी संसदेतही या मुद्द्यावरुन गदारोळ घातला होता. आता शिवसेनेनं या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका केली आहे. ‘पेगॅसस’ हा निवडक हिंदुस्थानींवर झालेला सायबर हल्ला आहे व केंद्र सरकारच्या संमतीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही. पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

या सर्व प्रकरणाची चौकशी ‘जेपीसी’ म्हणजे संयुक्त संसदीय समितीने करावी ही पहिली मागणी. नाही तर सर्वोच्च न्यायालयाने ‘स्यु मोटो’ दाखल करून घेऊन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. त्यातच राष्ट्रहित आहे. पण राष्ट्रहित, राष्ट्राची इभ्रत याची फिकीर खरेच कोणाला पडली आहे काय? देश एका अंधाऱया गर्तेत सापडला आहे. ‘पेगॅसस’ हा निवडक हिंदुस्थानींवर झालेला सायबर हल्ला आहे व केंद्र सरकारच्या संमतीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीका केली आहे.

इस्राएल हिंदुस्थानचा मित्र देश असल्याचे आपण समजत होतो. पंतप्रधान मोदी यांच्या काळात ही मैत्री जरा जास्तच घट्ट झाली. त्याच इस्राएलच्या ‘पेगॅसस’ या हेरगिरी करणाऱ्या ऍप्सने आपल्याकडील दीड हजारावर प्रमुख लोकांचे फोन चोरून ऐकल्याचे प्रकरण समोर आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक उद्योगपती, राजकारणी, पत्रकार अशा लोकांचे ‘फोन टॅप’ करण्यात आले. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा सरळ हल्ला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना हे पेगॅसस फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले. हा सरळ सरळ हेरगिरी करण्याचाच प्रकार आहे. जगातील सगळय़ात मोठय़ा लोकशाहीत हे घडले.

आपले गृहमंत्री शहा सांगतात, ‘‘देशाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे!’’ गृहमंत्र्यांनी हे विधान करावे हे आश्चर्यच आहे. देशाला बदनाम नक्की कोण करीत आहे, हे श्रीमान गृहमंत्री सांगू शकतील काय? सरकार तुमचे, देश आणि लोकशाही तुमची. मग हे सर्व करण्याची हिंमत कोणात निर्माण झाली आहे? प्रे. निक्सन यांच्या काळात ‘वॉटरगेट’ प्रकरण घडले. तेव्हा निक्सन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन घरी जावे लागले. राजीव गांधी यांच्या घराबाहेर हरियाणाचे दोन पोलीस उभे राहिले. हा आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार आहे म्हणून राजीव गांधी यांनी चंद्रशेखर यांचे सरकार पाडले. त्या सगळय़ांपेक्षा ‘पेगॅसस’ प्रकरण भयंकर आहे. ‘वॉटरगेट’ काळात तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs SL 2nd ODI | भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

आज मुंबईतील लसीकरण राहणार बंद