भारताची अर्थव्यवस्था 2024-25पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारणपणे तीन वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. कोरोना महामारीमुळे इतर देशांप्रमाणेच भारताची अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीतही जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणते आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले आणि भारताला यात सर्वात धक्कादायक स्थान मिळाल्याचे समोर आले आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ जारी केला आहे. या अहवालानुसार 149 देशांच्या यादीत भारत चक्क 139व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या अहवालानुसार 156 देशांच्या क्रमवारीत भारत 144 स्थानावर होता. तर, फिनलॅण्ड पहिल्या क्रमांकावर आहे. फिनलॅण़्डने सलग चौथ्यांदा पहिले स्थान पटकावले आहे. डेन्मार्क आणि स्वित्झर्लण्ड हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहेत. महामारीचा मोठा फटका बसलेली अमेरिका 19व्या स्थानावर आहे.
या यादीत शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे. तर आशियामध्ये चीन 84, नेपाळ 87, पाकिस्तान 105, बांग्लादेश 101, श्रीलंका 129व्या स्थानावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कने हा अहवाल तयार केला आहे. राहणीमान, सकारात्मकपणा आणि नकारात्मकतेच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला असून जीडीपी आणि सामाजिक सुरक्षितता याबाबी ही तपासण्यात आल्या.
Comments
Loading…