19 मार्च हा दिवस ‘वर्ल्ड स्लीप डे’ म्हणजेच जागतिक झोप दिन म्हणून साजरा होतो. आपल्या शरीराची अधिकतम वाढ ही झोपेत होत असते. आपले केस, नखं या सर्वाची वाढ झोपेमध्येच होत असते. या व्यतिरिक्त शरीराला होणारा फायदा जाणून घेऊयात.
उत्तम झोपेमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. (Immunity)
जेव्हा आपण चांगली झोप घेतो, तेव्हा आपले शरीर पेशी आणि प्रथिने तयार करत असतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते.

शरीराच्या वाढीस उपयुक्त (ग्रोथ) हॉर्मोन्स. (bones)
आपण झोपेत असताना आपल्या शरीराची जास्त वाढ होत असते. झोप नीट न झाल्यास आपली मज्जासंस्था (नर्वस सिस्टिम) योग्य प्रकारे काम करत नाही. त्यामुळे आपल्या हाडांसाठी उपयुक्त ग्रोथ हॉर्मोन्स शरीराला मिळत नाहीत.

झोपेचा कामावर परिणाम. (worklife)
उत्तम झोपेमुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. याचा आपल्या कामावर चांगला परिणाम दिसून येतो. वामकुक्षीमुळे आपण योग्यप्रकारे लक्ष केंद्रीत करू शकतो. चांगल्यापद्धतीने लिहू-वाचू शकतो. गणिती प्रश्न सोडविण्यासाठीची योग्य क्षमता मिळते. झोप पूर्ण न झाल्यास मात्र त्याचा वाईट परिणाम कामावरही दिसून येतो.

झोपेचा चेहऱ्यावर होणारा परिणाम. (Face)
झोपेचा हॉर्मोनल पातळीवर मोठा परिणाम होत असतो. झोपेमुळे कॉर्टिसलचे प्रमाण कमी होऊन त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावरील डाग, व्रणसारख्या समस्याही कमी होतात. तसेच दृष्टीही चांगली होते.

लैंगिक जीवनावर झोपेचा परिणाम. (sexlife)
झोपेचा लैंगिक जीवनावरही परिणाम होत असतो. लैंगिक जीवन उत्तम नसल्यास तणाव वाढतो. याचा जीवनातील इतर गोष्टींवरही परिणाम होतो. लैंगिकतेचा मेंदूशी गहिरा संबंध आहे. आपला मेंदू जितका निरोगी आणि शांत राहिल, लैंगिक जीवन तितकेच चांगले राहिल. वाढत्या वयानुसार झोप कमी होत असल्याने त्याचा लैंगिक जीवनावरही परिणाम होत असतो.

हृदयविकारापासून संरक्षण. (Heart)
उत्तम झोपेमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. झोपेमुळे मांसपेशींना आराम मिळतो. यात हृदयाचाही समावेश आहे. चांगली झोप घेतल्याने हृदय आणि रक्तदाब सुरळीत राहतात. त्यामुळे हृदयाच्या रोगांपासूनही संरक्षण होते.

किती आणि कशी झोप आवश्यक. (sleep)
वयोवृद्धांसाठी सलग ७-८ तास तर तरुणांसाठी ९-१० तास झोप आवश्यक आहे. लहान मुलांसाठी तर त्याहून अधिक काळाची झोप गरजेची असते. कोणत्या स्थितीत झोपल्यावर तुम्हाला चांगली झोप लागते, त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आणि त्या स्थितीत झोपणे योग्यही आहे. उत्तम झोप घेऊन आरोग्य देखील तंदारुस्त बनवा.

Comments
Loading…